Pages

Wednesday, January 17, 2024

प्रकल्पाचे विषय

विषय - 

१) माझी आवड, माझे छंद

२) माझा आवडता लेखक

३) आधुनिक कृषितंत्रज्ञान

Friday, February 14, 2020

'ट्रॉय'मधील तत्त्वज्ञान

    प्रिय मित्रांनो,

   'ट्रॉय' हा हॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चित्रपट आहे. तो होमरच्या 'इलियड' या महाकाव्यवर आधारलेला आहे. या चित्रपटाला ऑस्करसह अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. या चित्रपटातील अखिलिस या पात्राच्या तोंडी आलेली पुढील वाक्ये मला खूप आवडतात-
      "एक राज बताता हुँ जो पुजारी मंदिर मे नही बताते- देवता हमसे जलते है, इसलिए जलते है के हम अमर नहीं. वहाँ कोई भी पल आखरी हो सकता है, हर चिज हमारे लिए खुबसुरत है क्योंकि हमे मरना है. अभी जितने खुबसुरत तुम फिर कभी नही लगोगे, हम फिर कभी यहाँ नही होंगे" (हिंदी अनुवाद) 
     या वाक्यांमधून मानवी जीवन क्षणभंगूर आहे आणि म्हणून जीवनातला प्रत्येक क्षण, प्रत्येक वस्तू, व्यक्ती, प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी महत्वाची असायला हवी. आता आपण जसे आहोत, तसे आपण पुन्हा नसणार. गेलेला क्षण पुन्हा कधीच परत येत नाही तसेच कोणताही क्षण हा आयुष्यातील शेवटचा ठरू शकतो, म्हणून या क्षणभंगूर जीवनाचा आनंद पुरेपूर घ्यायला हवा. देव हे अमर असतात, म्हणून त्यांचे जगणे हे कंटाळवाणे असते. आपले  तसे नसते. आपल्यासाठी प्रत्येक क्षण नवीन, आव्हानात्मक असतो, म्हणून तर जगण्यात गंमत असते, असे तत्वज्ञान त्याने सांगितलेले आहे. 

(मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारे असे अनेक प्रसंग व संवाद या चित्रपटामध्ये आहेत. हा चित्रपट मी किमान २५-३० वेळेस तरी पाहिलेला आहे. प्रत्येक वेळेस त्यातून मला नवीन काहीतरी शिकायला मिळते,  नवीन आकलन होते, जगण्याची नवी दृष्टी प्राप्त होते).

आपला,

डॉ. राहूल रजनी

प्रेम कसं करावं? (व्हॅलेंटाईन डे विशेष)



प्रेम कसं करावं?
सर्वांसमोर सवाल आहे 
उत्तर त्याचे आज मी 
हळुवारपणे देणार आहे ।।१।।

प्रेम करावं चंद्रासारखं...
अंधार्‍या रात्रीवर भाळून 
हळूहळू तिच्या जवळ जावं
तिच्याशी एकरूप व्हावं 
स्वतःचं अस्तित्व विसरून 
अंधारच बनून उरावं ।।२।।

रात्रीनेही स्वतःचं रूप
चंद्राच्या प्रकाशात पहावं 
सौंदर्याने त्याच्या भारावून जाऊन 
आयुष्य आपुलं उजळवून टाकावं ।।३।।

एकमेकांनी मग एकमेकांना 
एकमेकांच्या साक्षीने शोधावं 
एकमेकांना ओळखत ओळखत 
प्रेम करत राहावं ।।४।।

चंद्राने आपुल्या शीतल प्रकाशात 
रात्रीला न्हाऊ घालावं
कधी रात्रीने चंद्राला आपुल्या 
काळ्याशार बाहूत घ्यावं ।।५।।

मिलनाचं हे सत्र 
सृष्टीअंतापर्यंत सुरूच राहावं 
एकमेकांना ओळखत ओळखत 
प्रेम करत राहावं ।।६।।

© copyright
डॉ. राहूल रजनी
Mob. No. 9623092113


Thursday, February 13, 2020

शिवजयंतीनिमित्त...

          प्रिय मित्रांनो, 

       येत्या १९ फेब्रुवारी रोजी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराष्ट्रातील पहिले पराक्रमी व कर्तबगार महापुरुष, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१वी जयंती आपण सर्वजण उत्साहात साजरी करणार आहोत. या दिवशी आपण मोटरसायकलला झेंडा लावून रॅल्या काढतो, मिरवणुका काढतो. सण म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. करायलाच हवे! कारण महाराष्ट्राच्या इतिहासातील हा खऱ्या अर्थाने एक सोनेरी दिवस आहे.

       मित्रांनो, महाराजांनी महाराष्ट्रातील जनतेच्या नसानसांमध्ये, मनामध्ये पराक्रम, शौर्य, कर्तबगारी निर्माण केली. इथल्या माणसाला सन्मानाने, स्वाभिमानाने जगायला, त्यासाठी लढायला शिकवले. रयतेचे राज्य निर्माण केले. सामान्य शेतकऱ्यांना, स्त्रियांना सुरक्षितता प्रदान केली. येथूनच भारताला आणि जगाला महाराष्ट्राची एक नवीन ओळख झाली. म्हणून  छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आराध्य दैवत आहेत.

           असे असले तरी ते अद्भुत व दैवी पुरुष नव्हते. त्यांनी माणूस म्हणून जन्म घेतला. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना एक ध्येय दिले व त्या पद्धतीने त्यांना घडवले. महाराजांनी स्वतः सर्व जाती-धर्मातील लोकांचे संघटन निर्माण केले. एका उदात्त ध्येयासाठी त्यांना एकत्र केले व अन्यायी शक्तींशी (मग तो कोणीही असो) लढायला शिकवले, स्वतः लढले. प्रसंगी स्वतःचे प्राण पणास लावले व या महाराष्ट्र भूमीमध्ये न्यायाचे, सर्वसामान्यांचे राज्य निर्माण केले.    

       महाराजांची जयंती आपण उत्स्फूर्तपणे, उत्साहाने साजरी करणारच आहोत. घरासमोर रांगोळ्या काढून  दिवे लावणारच आहोत, मोटरसायकलवर, घरावर झेंडे लावणारच आहोत, मिरवणुका काढून देहभान विसरून आनंदाने नाचणारच आहोत. परंतु यासोबत जर या दिवशी आपण व्याख्यानांच्या, वाचनाच्या माध्यमातून महाराजांना समजून घेण्याचा प्रयत्न केला, आपल्या मुलांवर त्या पद्धतीचे संस्कार घडविण्याचा संकल्प केला, तरच या जयंतीचे औचित्य राहिल व आपल्या भावी पिढ्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. नाहीतर इतर सणांप्रमाणे फक्त सण म्हणून हा दिवस आपण साजरा करत राहू व महाराजांच्या स्वप्नातील समाजनिर्मिती कधी प्रत्यक्षात अस्तित्वात येणार नाही. 

            महाराजांना अभिवादन करणे म्हणजे त्यांच्या स्वप्नातील समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करणे, त्यासाठी महाराजांना समजून घेणे, मुलांना घडविणे, असे मला वाटते. बाकी आपण विचार करा!

        आपणास पाच दिवस आधीच शिवजयंतीच्या कोटी-कोटी शुभेच्छा! 

           जय शिवराय!!!

आपला,

- डॉ. राहूल रजनी

Sunday, February 9, 2020

चंद्राचे आणि माझे नाते

चंद्राचे आणि माझे नाते
तसे खूप जुने आहे

कधीकाळी भाकरीत चंद्र दिसायचा
चंद्रात भाकरी शोधायचो
ती मिळावी म्हणून 
ऊन-वारा-पावसाशी झुंजायचो
नाही मिळाली तर 
हळूच टीपं गाळायचो

चंद्राचे आणि माझे नाते
तसे खूप जुने आहे

कधी चंद्रात तिला पहिले
कधी तिच्यात चांद पहिला
तो मिळावा म्हणून 
तीळतीळ तुटलो
सुनसान रस्त्यांवरून 
रात्रीचा हिंडलो
चंद्राने अनेकदा 
हुलकावणी दिली
मग मी आकाशातील 
चंद्राशीच बातचीत केली

चंद्राचे आणि माझे नाते
तसे खूप जुने आहे

कधी तिच्यासोबत चंद्र पहिला
कधी तिच्याशिवाय पहिला
तिच्यासोबत चंद्रप्रकाशात
उजळून निघालो
ती नसता अंधाराला
बिलगून रडलो

चंद्र असा नेहमीच
माझ्या सोबतीला राहिला
कधी भाकरीत, 
कधी तिच्यात
कधी आकाशात
कधी मनात
कधी डोळ्यांत राहिला
चंद्र असा नेहमीच
माझ्या सोबतीला राहिला

म्हणून म्हणतो
चंद्राचे आणि माझे नाते
खूप जुने आहे...
चंद्राचे आणि माझे नाते
तसे खूप जुने आहे...

(दि. १०/०२/२०२० जव्हार ते नाशिक सहलीच्या वेळेत प्रवासात सकाळी ५.३० ते ६.१६ दरम्यान)

© copyright
डॉ. राहूल रजनी
patilrahulb14@gmail.com
Mob. No. 9623092113

Wednesday, February 5, 2020

भाबडेपणा

एखाद्या गुरूवर, देवावर अतिशय निस्सीम श्रद्धा ठेवली, श्रद्धापूर्वक एखाद्या ग्रंथाचे खूप वेळेस पारायण केले किंवा अगदी नियमित बैठकीला गेले, तर आपल्या आयुष्यात आपोआपच चांगले घडेल, सुख- संपत्ती, समृद्धी, शांतता नांदेल व पूण्यसंचय होईल असे समजणे, हे अतिशय भाबडेपणाचे असून ती अंधश्रद्धा आहे.

Monday, February 3, 2020

प्रगतीचे लक्षण

असंख्यांच्या दृष्टीने प्रगतीचे लक्षण-
भल्या-बुऱ्या मार्गाने भरपूर पैसे कमविणे व गरजा वाढवून, प्रतिष्ठेपायी  भरपूर पैसा खर्च करणे!